पुणे : बारामतीच्या राजकारणात लवकरच नव्या दादाची एन्ट्री होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. बारामतीतील सांगवीमध्ये बोलताना त्यांनी हे संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांना घेरण्याची रणनिती शरद पवारांनी आतापासूनच आखायला सुरुवात केली आहे.
बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीचे संकेत दिले. त्यामुळे बारामतीमध्ये काका अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार असा थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युगेंद्र पवारांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुप्रिया सुळेंना युगेंद्र पवारांनी खंबीर साथ दिली. यानंतर बारामतीचा दादा बदला, अशी मागणी बारामतीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याने युगेंद्र पवारांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत. शरयू अॅग्रोचे ते सीईओ आहेत. बारामती विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. शांत, संयमी आणि मितभाषी नेतृत्व असे गुण त्यांच्यात आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवारांना साथ दिली. लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूनं त्यांनी जोरदार प्रचार केला. सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
काका विरुद्ध पुतण्या होणार लढत?
जर बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना विधानसभेचे तिकीट दिले गेले तर अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होऊ शकते.