पौड, (वार्ताहर) – मुळशी धरण भागातील प्लस व्हॅली येथील मिल्कीबार धबधब्याच्या पाण्यात पोहताना आदेश जितेंद्र पवार (वय२१, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव, पुणे मुळगाव नाशिक) या युवकाचा बुडून मृत्यु झाला आहे.
गुरुवार (ता.२७) दुपारी १२.३० वा सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत त्याचे चुलते प्रशांत दत्तात्रय पवार,( वय ४६, रा. मु.पो.ता. भडगाव, जि.जळगाव) यांनी पोलिसांत खबर दिली.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (ता.२७) रोजी आदेश व त्याचे तीन इतर मित्र मुळशी धरण भागातील प्लस व्हॅलीतील मिल्की बार धबधब्याच्या येथे पर्यटनासाठी आले. दुपारी १२.३० वा सुमारास ते धबधब्याच्या पाण्यात पोहू लागले.
पोहत असताना आदेश धबधब्याच्या पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी व इतर पर्यटकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. परंतू तो बेशुध्द होता, त्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आदेशच्या मित्रांनी आदेशच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली.
आदेशला अत्यंत दुर्गम सुमारे दोन हजार फूट खोल दरीत असणाऱ्या मिल्कीबार धबधब्यातून वर मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याचे अत्यंत अवघड काम पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, समीर शेख, पोलीस नाईक महेश पवार,
ताम्हिणी अभयारण्य क्षेत्रपाल एस .डी. इंगळे, शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळाचे सचिन गायकवाड व टिम,सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगडचे सागर दहिंबेकर व टिम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे, शेलार मामा रेस्क्यू टीमने केले.
नंतर त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून पौड (ता.मुळशी) येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.