इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याच्या राजकारणाचे वस्ताद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अनेक घडामोडी केल्या. राज्याचे माजी सहकार मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले.
मात्र राजकीय वस्ताद असलेले शरद पवार यांनी आपले असे डाव टाकले की, पाटील आणि भरणे यांना सोडून तब्बल 25 हजार पेक्षा अधिक मतांचे लीड तुतारी चिन्हावर इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाले.
विधानसभा निवडणुकीआधीच आपला राजकीय डाव शरद पवारांनी यशस्वी केला. आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेला हा डाव किती खेळी करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
इंदापूर तालुक्यात शरद पवार गटात जाण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. अशी सर्वत्र चर्चा पारा – पारावर रंगत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहताना तालुक्यातील विकास कामांना गती देणारे नेतृत्व, हे सामान्य जनतेलाही माहिती आहे. त्यांच्याच माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी जो आजपर्यंत तालुक्याचा विकास झाला नाही.
तो करून दाखवला. चंद्र जसा कलेकलेने वाढतो, त्याच वेगाने पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांच्या हातातून निसटल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची क्रेज निर्माण झाली. यामध्ये इंदापूर तालुक्यातील जनतेने प्रचंड या क्रेजमध्ये दाद दिली.
अनेकांना शरद पवारांच्या पक्षात जावे वाटते आहे; मात्र शरद पवार कोणाला घेणार, कोणाला डावलणार, हे गणित मात्र न कळणारे आहे. एकीकडे जे पक्षाला पोषक असतील त्यांना संधी देऊ, असे सूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटातून ऐकायला मिळतात. दुसरीकडे नव युवक चेहऱ्याला आमदारकीचे तिकिट शरद पवार बहाल करणार, अशीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हा व राज्यभर आम्हाला संधी देता का, अशी स्थिती निर्माण झालेली दिसते आहे.
भरणे की पाटील
लोकसभा निवडणूक कालावधीत इंदापूर तालुक्याच्या विधानसभेबद्दल राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवर जो निर्णय ठरेल, तो शिरसावंद्य असेल असे म्हणून मोकळे झाले. लोकसभा निवडणुकीची वेळ निघून गेली.
आता विधानसभेची वेळ आली. मागील आठवड्यापासून आम्हीच लढणार, अशा वल्गना सुरू झाल्या; मात्र आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तिकिटाचा घोळ अद्यापि तरी मिटलेला नाही.
इनकमिंग वाढणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांनी, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या समर्थकांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
मात्र राजकीय वस्ताद असलेले शरद पवार कोणाच्या पाठीशी खंबीर उभे राहतात. त्यांच्या पक्षात कोणाचे इनकमिंग होईल याचा मात्र अंदाज कोणालाही लागलेला नाही.