पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी, यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी पाठविलेल्या नोटिसीला आम्ही घाबरत नाही. पुण्यात केवळ अधिकृत 23 पब, बार आहेत.
त्यांच्याकडे परवाना आहे. मग 100 पब, बार कोणाच्या आशीर्वादने चालतात, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
पुण्याची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी, तसेच मंत्री आणि अधिकार्यांच्या राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या, पुणे विद्येचे माहेरघर म्हटले जाते; पण आता याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकार्यांचे आणि मंत्र्यांचे लागेबांधे असल्याचा घणाघाती आरोप देखील अंधारे यांनी केला.
त्या म्हणाल्या, पुण्यातील पब, बारची माहिती आमच्याकडे आहे. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत कारवाई का करत नाहीत. राजपूत यांचे निलंबन करून कारवाई केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. 23 अधिकृत पब बार व्यतिरिक्त इतर पब बारवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.