पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, तसेच रस्त्याकडेला असलेली अनधिकृत होर्डिंग, दुकाने हटविण्याची कार्यवाही महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोडच्या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग, केबल्स, स्टॉल्स आणि इतर अनधिकृत बांधकामे येत्या दि. 30 जूनपर्यंत काढून घ्यावीत, या मुदतीत ही अनधिकृत बांधकामे न हटविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा महामार्ग प्राधिकरणाने दिला आहे.
नागरिकांनी आपले होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे असतील तर स्वखर्चातून काढून घ्यावीत; अन्यथा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाईल, असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.