नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने 10 उमेदवारांची नाव निश्चित केली असून यातल्या 5 जणांना तिकीट दिलं जाईल अशी बातमी समोर आली होती. तसेच याच्यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लेटरहेडचा फोटोही व्हायरल झाला होता. पण आता हे लेटरहेड फेक असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
‘महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी संभाव्य नावे टाकून प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लेटरहेडचा वापर केला जात आहे, ते लेटरहेड अधिकृत नाही. या अनधिकृत लेटरहेडचा वापर करून संभ्रम पसरविण्यात येत आहे’, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नवा ट्विस्ट आला आहे.
फेक लेटरहेडवर कुणाची नावं?
या लेटरहेडवर विधानपरिषदेसाठी 10 नावं समोर आली होती. यात पंकजा मुंडे, अमित गोरखे, परणिय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक यांची नावं टाकण्यात आली होती.
‘या’ दिवशी होणार निवडणूक
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे. यात भाजप 5 जागांसाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 2-2 जागांसाठी प्रयत्नशील असतील तर काँग्रेसला एक आणि महाविकासआघाडी एकत्रित एक जागा लढण्याची शक्यता आहे.