पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहर व ग्रामीण भागातील काही पब, हॉटेल चालकांकडून अल्पवयीन मुलांना मद्यविक्री किंवा सेवा देणे, असे प्रकार घडत आहे, या पार्श्वभूमीवर अशा गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून आता पाऊले उचलण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून उत्पादन शुल्क विभागाने सर्व हाॅटेल, बार, पब आदी मद्यविक्रीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या सीसीटीव्ही प्रक्षेपण थेट उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक आणि अधीक्षक यांना मोबाइलवर दिसणार आहे.
कल्याणीनगर येथील घटनेत अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याच्या घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. त्यानुसार या सूचना देण्यात आल्या आहेत. मद्य पुरवठा केला जाणाऱ्या जागेत म्हणजेच बार काऊंटर येथे सीसीटीव्हीद्वारे चित्रण होईल, अशा पद्धतीने किमान दोन सीसीटीव्ही बसवावेत.
बार काउंटरवर होणारा मद्य पुरवठा पूर्णत: कॅमेराच्या दृष्टीक्षेपात येऊन त्यावर चोख नजर ठेवता येईल, अशा पद्धतीने सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच या सीसीटीव्हीचे रेकाॅर्डिंग किमान महिनाभरासाठी साठविले जाईल, अशी बॅकअप व्यवस्था ठेवण्यात यावी. तसेच ही सुविधा 24 तास चालू राहिणे अपेक्षित आहे. त्यासाठी इन्व्हर्टर सुविधाही असावी. निरीक्षक अथवा अधीक्षक यांना सीसीटीव्ही लाइव्ह बघण्यासाठी आवश्यक असलेला युझर आयडी आणि पासवर्ड देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“एआय’ची मदत
सीसीटीव्ही किमान दोन मेगा पिक्सेलचे असावेत, कॅमेरामध्ये कृत्रिम बुद्धिमता (एआय) आधारे छायाचित्रीत माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विशिष्ट साॅफ्टवेअरची सुविधा असणे पब, बार यांना बंधनकारक करण्यात आले आहे.