– माधव विद्वांस
लेगब्रेक, गूगली गोलंदाजी करणारे तसेच उजव्या हाताने फलंदाजी करणारे क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे क्रीडा, अभिनय आणि गायन असे त्रिगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व होते.त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1923 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पेरूगेटजवळील भावे स्कूलमध्ये झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण एसपी महाविद्यालयात झाले. गणित विषयात त्यांनी एमए पदवी घेतली. मंत्रालयात ते अधिकारी पदावर होते. अभिनेते श्रीराम लागू त्यांचे स्नेही होते. लागू यांनी त्यांच्या लेखनात सदाशिव शिंदे यांचा उल्लेख केला आहे.
महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी नाटक व गाण्यांचे कार्यक्रम केले होते. त्यांना त्यावेळी ‘सदू शिंदे’ या आपुलकी दाखविणार्या संबोधनाने ओळखले जायचे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे जावई. खासदार सुप्रिया सुळे यांचे आजोबा. प्रतिभाताई पवार यांचे ते वडील. शिंदे यांचा विवाह बडोद्याचे ब्रिगेडियर राणे यांची कन्या निर्मला यांच्याबरोबर झाला. त्यांना चार मुली झाल्या. थोरल्या प्रतिभा पवार (शरद पवार यांच्या पत्नी) दुसर्या सुनीता नामजोशी, तिसर्या सुलेखा देसाई व चौथ्या कोल्हापूर येथील संस्थानचे मंत्री भास्करराव जाधव यांच्या नातस्नुषा, रणजीत अप्पासाहेब जाधव यांच्या पत्नी गीता या चारही बहिणी हयात आहेत.
लेग ब्रेक आणि पारंपरिक गूगली व्यतिरिक्त, शिंदे वेगळी गूगली देखील टाकायचे. क्रिकेटच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस वर्ष 1943-44 हंगामात सदाशिव शिंदे क्रिकेटविश्वात चर्चेत आले ते त्यांच्या 186 धावांच्या खेळामुळे. या वेळी झालेल्या मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यादरम्यान महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी 186 धावा काढून पाच विकेट घेण्याचा करिश्मा दाखविला होता. कारकिर्दीत 79 प्रथम श्रेणी सामन्यात 871 धावा व 230 बळी घेतले, तर 7 कसोटी सामन्यात 75 धावा व 12 बळी घेतले होते. त्यानंतर 1946 मध्ये भारतीय संघासोबत इंग्लंडचा दौरा केला आणि कसोटीमध्ये पदार्पण केले. या दौर्यातील सामन्यांमध्ये 39 बळी घेतले. या दौर्यावरील कसोटी सामन्यात, लॉर्डस्वर, त्यांनी रुसी मोदीसोबत शेवटच्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली होती.
वर्ष 1951-52 मध्ये दिल्ली येथे इंग्लंडविरुद्ध कसोटीत त्यांनी मोठे यश मिळवले. मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी तिसरा बदल म्हणून त्यांना गोलंदाजी देण्यात आली. भोजनानंतर लगेचच त्यांनी डॉन केनियन यांची मधली स्टम्प गूगली टाकून उडवली आणि त्यानंतर जॅक रॉबर्टसनला यष्टीचीत व डोनाल्ड कारला लेगब्रेकवर यष्टिरक्षक नाना जोशीकडून झेलबाद केले.
शिंदेंच्या कामगिरीमुळे भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. परंतु भारताला हा सामना दुसर्या डावात टिकवता आला नाही. शिंदे यांना त्याच वर्षात 1952 मध्ये इंग्लंड दौर्यात संघात स्थान मिळाले. यावेळी त्यांनी 39 विकेट्स घेतल्या. लॉर्ड्स मैदानावर पीटर मे यांची घेतलेली विकेट ही त्यांची टेस्टमधील शेवटची होती. त्यांचे वयाच्या 32व्या वर्षी 22 जून 1955 रोजी निधन झाले. ते गेले त्यावेळी प्रतिभाताई 6 वर्षांच्या व धाकट्या गीता 6 महिन्यांच्या होत्या. शिंदे यांच्या नावावर सध्या कोणताही विक्रम नाही, पण अल्प आयुष्यात जे काही खेळले तोच त्यांचा विक्रम आहे.