T20 World Cup 2024 (USA Vs PAK) : टी-20 विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात गुरूवारी पाकिस्तानचा सामना यजमान अमेरिकेशी झाला. हा गट-अ सामना डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील पहिला मोठा उलटफेर अमेरिकेने घडवला आहे. त्यांनी अ गटातील सामन्यात 2009 च्या चॅम्पियन पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. यासह अमेरिकन संघाने स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
दरम्यान, नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत सात गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेच्या संघाला 20 षटकांत तीन गडी गमावून 159 धावाच करता आल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ सहा चेंडूत 1 बाद केवळ 13 धावाच करू शकला.
सौरभ नेत्रावळकर सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करून यूएसएला विजय मिळवून देणारा हिरो ठरला आहे. त्याने अफलातून गोलंदाजी करताना पाक फलंदाजांना जखडून ठेवले. याउलट पाककडून सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद आमीरने 3 वाईड बाॅल टाकले आणि त्यावर 4 एक्स्ट्रा धावाही दिल्या.
सुपर ओव्हरमध्ये काय घडले…?
यूएसएचा डाव – यूएसएने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली. मोहम्मद आमिरच्या पहिल्याच चेंडूवर आरोन जोन्सने चौकार मारला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर जोन्सने एकच धाव घेतली. आमिरला चौथा चेंडू पुन्हा टाकावा लागला कारण वाईडसोबतच हरमीत सिंगनेही एक धावही घेतली. चौथ्या चेंडूवर जोन्सने पुन्हा एकच धाव घेतली. आमिरची गोलंदाजीची लय पुर्णपणे बिघडली होती, त्यामुळे त्याने आणखी एक वाइड बाॅल टाकला आणि यावेळीही या दोघांनी एक्स्ट्रा रन पळून काढला. पाचव्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली, पण सहाव्या चेंडूआधी आमिरने पुन्हा वाईड टाकला, ज्यावर अमेरिकेच्या फलंदाजांनी 2 धावा पळून काढल्या. नंतर शेवटच्या चेंडूवर एका धावेसह यूएसएने 18 धावा फलकावर लावल्या.
पाकचा डाव – नेत्रावलाकरने पहिला चेंडू निर्धाव टाकला. पण इफ्तिखार अहमदने दुसऱ्या चेंडूवर त्याला चौकार ठोकला. पुढचा चेंडू वाईड झाला आणि लगेचच तिसऱ्या चेंडूवर इफ्तिखार झेलबाद झाला. चौथा चेंडू फलंदाज शादाबच्या पायाला लागला आणि चौकार गेला. पाचव्या चेंडूवर 2 धावा तर शेवटच्या चेंडूवर एक धाव आली. आणि अशाप्रकारे सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेच्या 18 धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानला केवळ 13 धावाच करता आल्या.
WHAT. A. FINISH!!!! 🤩🤩#TeamUSA wins their second match of the @ICC @T20WorldCup against Pakistan by 5 runs! 🔥#T20WorldCup | #USAvPK | #WeAreUSACricket 🇺🇸 pic.twitter.com/hYuDW0zvTj
— USA Cricket (@usacricket) June 6, 2024
अमेरिका गुणतालिकेत अव्वल स्थानी…
2024 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि त्यातच त्यांना त्यांच्यापेक्षा खूपच कमकुवत असलेल्या अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह अमेरिकेचा संघ अ गटात दोन विजय आणि चार गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर भारत एका सामन्यानंतर दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना 9 जून रोजी भारताविरुद्ध आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा संघ आता 12 जूनला भारताशी भिडणार आहे.
अन् सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला….
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएसएची सुरुवात चांगली झाली कारण कर्णधार मोनांक पटेल आणि स्टीव्हन टेलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अमेरिकेला 36 वर पहिला धक्का बसला. नसीम शाहने स्टिव्हन टेलरला रिजवान करवी झेलबाद केले. त्याला 12 धावा करता आल्या. त्यानंतर अमेरिकेला 104 धावांवर दुसरा धक्का बसला. हॅरिस रौफने अँड्रेस गॉसला क्लीन बोल्ड केले. त्याला 26 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा करता आल्या. गौसने कर्णधार मोनांक पटेलसोबत 68 धावांची भागीदारी केली. अमेरिकेला 14.1 षटकात 111 धावसंख्येवर तिसरा व मोठा धक्का बसला. कर्णधार मोनांक पटेल 38 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला. आमिरने त्याला रिझवानकरवी झेलबाद केले.
त्यानंतर एकेकाळी अमेरिकन संघ धावांचा पाठलाग करताना पुढे होता आणि संघ सहज जिंकेल असे वाटत होते. 16 षटकांत अमेरिकेने 3 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या आणि 24 चेंडूत 34 धावा हव्या होत्या. इथून पाकिस्तानी गोलंदाजांनी सामना फिरवला. पुढच्या तीन षटकात 19 धावाच दिल्या आणि आता 20 व्या षटकात म्हणजेच 6 चेंडूत अमेरिकेला विजयासाठी 15 धावांची गरज होती.
हारिस रौफ गोलंदाजी करत होता. आरोन जोन्स आणि नितीश कुमार स्ट्राइकवर होते. नितीशने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर जोन्सनेही दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवरही एक धाव आली. ॲरॉन जोन्सने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून अमेरिकेला सामन्यात परत आणले. यानंतर जोन्सने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. अशाप्रकारे अमेरिकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. नितीश आता स्ट्राईकवर होता. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना बरोबरीत आणला. यादरम्यान आरोन जोन्सने 26 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह 35 धावांची नाबाद खेळी केली तर नितेश कुमारनेही 14 चेंडूत एका चौकारासह नाबाद 14 धावा करत महत्वपूर्ण खेळी केली.
तत्पूर्वी, प्रथम खेळताना पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 159 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 44 तर शादाब खानने 40 धावांची खेळी केली. आझम खान पुन्हा फ्लॉप झाला आणि गोल्डन डकचा बळी ठरला. त्याचवेळी इफ्तिखार अहमद 14 चेंडूत 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहीन आफिद्रीने 16 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 23 धावांची नाबाद खेळी खेळली. दरम्यान, अमेरिकेकडून गोलंदाजीत नॉशतुश केन्झिगेने 3 विकेट घेत प्रभावित केले. तर सौरभ नेत्रावळकरने दोन गडी बाद केले. अली खान आणि जसदीप सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.