T20 World Cup 2024 (Who Is Aaron Jones) : टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. डॅलसच्या ग्रँड प्रेरी स्टेडियमवर यजमान अमेरिकेने 7 विकेट्सने ऐतिहासिक असा विजय मिळवला. अमेरिकेला विजय मिळवून देण्यात ॲरोन जोन्सचे सर्वात मोठे योगदान होते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोन्सने शानदार खेळी करत अमेरिकेला एकतर्फी विजय मिळवून दिला.
अमेरिकन फलंदाजाने 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94* धावांची खेळी केली, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही देण्यात आला. पण आरोन जोन्स कोण आहे? त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया..
कोण आहे आरोन जोन्स…?
ॲरॉन जोन्सचा जन्म 19 ऑक्टोबर 1994 रोजी क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. जोन्सचे पालक बार्बाडोसचे आहेत. त्यामुळे जोन्सनं सुरूवातीला वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळावे असं ठरवलं असेल. वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळण्याच्या आशेने त्याने आपला प्रवास सुरू केला आणि 2016 मध्ये बार्बाडोससाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये, जोन्सने बार्बाडोससाठी प्रथम श्रेणीत पदार्पण केले. जोन्सने वेस्ट इंडिजच्या शाई होप आणि जेसन होल्डरसोबत आणि निकोलस पूरन विरुद्ध भरपूर क्रिकेट खेळले आहे.
पण त्यानंतर ॲरॉनने अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतला आणि 2018 मध्येच अमेरिकेसाठी खेळायला सुरुवात केली. त्याने 2019 मध्ये यूएससाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि संघासाठी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो पहिला फलंदाज ठरला. अशाप्रकारे जोन्सच्या क्रिकेटची सुरुवात झाली आणि आता त्याने टी-20 वर्ल्ड कपच्या मोठ्या मंचावर आपला जलवा दाखवला आहे.
आजवर अशी राहिली आहे आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
उल्लेखनीय आहे की, ॲरॉन जोन्सने आतापर्यंत 43 एकदिवसीय आणि 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 43 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 36.35 च्या सरासरीने 1 हजार 454 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 10 अर्धशतके झळकावली. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 25 डावांमध्ये फलंदाजी करताना जोन्सने 28.11 च्या सरासरीने आणि 116.87 च्या स्ट्राइक रेटने 478 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने 2 अर्धशतके केली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 94* धावा आहे.