T20 World Cup 2024 Records : टी-20 विश्वचषक 2024 ला धमाकेदार सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना कॅनडा आणि यजमान अमेरिका यांच्यात झाला. डॅलसच्या ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकेने दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 194 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकांत 3 गडी गमावून 197 धावा करत सहज विजय मिळवला.
अमेरिकेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे धावांचे आव्हान अवघ्या 17.4 षटकात पूर्ण केले. टी-20 विश्वचषकात अमेरिकेचा हा पहिला विजय ठरला. यासह टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली, ज्यामध्ये अमेरिकन फलंदाज आरोन जोन्सचे नाव चर्चेत राहिले. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात कोणते विक्रम झाले.
(1) टी-20 विश्वचषकातील तिसरा सर्वात मोठा धावांचा पाठलाग
अमेरिकेने कॅनडाचा पराभव करताना टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पाठलाग केला. यापूर्वी 230 धावांचे सर्वात मोठे धावांचे आव्हान इंग्लंडने 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गाठले होते.
टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठ्या 5 धावांचा पाठलाग..
230 धावा : इंग्लंड (विजयी) विरूध्द दक्षिण आफ्रिका, (वानखेडे, 2016)
206 धावा : दक्षिण आफ्रिका (विजयी) विरुद्ध वेस्ट इंडिज, (जोबर्ग, 2007)
195 धावा : यूएसए(विजयी) विरुद्ध कॅनडा, (डॅलस, 2024)
193 धावा : वेस्ट इंडिज (विजयी) विरुद्ध भारत (वानखेडे, 2016)
192 धावा : पाकिस्तान (विजयी) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ग्रोस आयलेट, 2010)
(2) आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अमेरिकेचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग…
195 धावा – विरुद्ध कॅनडा, डॅलस, 2024 (टी-20 विश्वचषक 2024)
169 धावा – विरुद्ध कॅनडा, ह्यूस्टन, 2024
155 धावा – वि जर्सी, बुलावायो, 2022
154 धावा – बांगलादेश, ह्यूस्टन 2024
(3) टी20 आंतरराष्ट्रीय मधील अमेरिकेची सर्वात मोठी भागीदारी…
131 धावा – अँड्रिज गस आणि आरोन जोन्स विरुद्ध कॅनडा, डॅलस, 2024
110 धावा – सुशांत मोदानी आणि गजानंद सिंग विरुद्ध आयर्लंड, लॉडरहिल, 2021
104 धावा – मोनांक पटेल आणि स्टीव्हन टेलर विरुद्ध कॅनडा, ह्यूस्टन, 2024
104 धावा – नितीश कुमार आणि कोरी अँडरसन विरुद्ध कॅनडा, ह्यूस्टन, 2024
(4) टी-20 विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार
अमेरिकेचा ॲरॉन जोन्स हा टी-20 विश्वचषकाच्या एका डावात 10 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. हा आकडा पहिल्यांदा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने गाठला.
11 षटकार – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2016
10 षटकार – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग, 2007
10 षटकार – आरोन जोन्स विरुद्ध कॅनडा, डॅलस, 2024
8 षटकार – रेली रॉसो विरुद्ध बांगलादेश, सिडनी 2022
(5) टी-20 विश्वचषकात एका षटकात सर्वाधिक धावा…
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कॅनडाच्या जेरेमी गॉर्डनने 14व्या षटकात 33 धावा दिल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात महागडे षटक ठरले. या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक स्टुअर्ट ब्रॉडने 2007 मध्ये टाकले होते, जेव्हा भारताच्या युवराज सिंगने सलग 6 षटकार मारले होते. ब्रॉडने 36 धावा दिल्या होत्या.
36 धावा : स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध भारत, डर्बन, 2007
33 धावा : जेरेमी गॉर्डन विरूध्द यूएस, डॅलस, 2024
32 धावा : इझातुल्ला दौलतझाई विरुद्ध इंग्लंड, (कोलंबो, 2012)
30 धावा : बिलावल भाटी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मीरपूर, 2014)
(6) अमेरिकेसाठी सर्वात वेगवान अर्धशतक …
94 धावांची नाबाद खेळी खेळणाऱ्या आरोन जोन्सने कॅनडाविरुद्ध यूएस टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
(7) लांब षटकार मारणारा फलंदाज
टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत 100 मीटरपेक्षा जास्त लांब षटकार मारणारा आरोन जोन्स हा पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने एकूण 10 षटकार मारले ज्यात एक षटकार 103 मीटर लांब होता.