धरमशाला, (हिमाचल प्रदेश) – तिबेटशी संबंधित प्रश्नांवर आता अमेरिकेने पुढाकार घेण्याचा निर्णय घतला आहे. रिसोल्ह तिबेट ऍक्ट या विशेष कायद्यावर अध्यक्ष ज्यो बायडेन लवकरच स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या संसदेतील परराष्ट्र व्यवहार समितीचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मायकेल मॅकॉल यांनी दिली आहे.
याकायदा अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने गेल्या आठवड्यातच मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची धर्मशाला येथे भेट घेण्यासाठी मॅकॉल सध्या उच्चस्तरिय शिष्टमंडळासोबत भारत भेटीवर आले आहेत.
संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांचा समावेश असलेले हे शिष्टमंडळ आज कांगडा विमानतळावर आले. तिबेटच्या मध्यवर्ती प्रशासनाच्यावतीने या शिष्टमंडळाचे स्वागत केले गेले.
या आठवड्याच्या सुरुवातीला, अमेरिकेच्या संसदेने चीनला दलाई लामा आणि इतर तिबेटी नेत्यांशी तिबेटची स्थिती आणि राज्यकारभाराबाबतचा वाद शांततेने सोडवण्यासाठी पुन्हा सहभागी होण्याचे आवाहन करणारे विधेयक मंजूर केले आहे.
तिबेटबाबत चीन आणि तिबेटमध्ये मध्यस्थीचा हा प्रयत्न असेल.
तिबेटच्या जनतेला अमेरिकेचा पाठिंबा असून दलाई लामा यांना भेटून हा पाठिंबा दर्शवण्यासाठीच आपण आलो असल्याचे मॅकॉल यांनी सांगितले. दलाई लामा यांच्याबरोबर होणाऱ्या भेटीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापती नॅ’न्सी पेलोसी यांनी व्यक्त केली.