बारामती, (प्रतिनिधी)- बारामती लोकसभेत निवडणणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात युगेंद्र पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यावरुन आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांचे नाव पुढे येत आहे.
बुधवारी (दि १९) काटेवाडी येथे युगेंद्र पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य करीत आगामी विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या नावाच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.
बारामती लोकसभेनंतर बारामती विधानसभा निवडणुकीची आतापासूनच चर्चा रंगली आहे. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे युगेंद्र पवार यांना घेऊन आतापासूनच मैदानात उतरले आहेत.
पवारांनी संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र हेच मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
काटेवाडीत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, संपूर्ण बारामती आपलं घर असलं तरी सुद्धा आपलं मूळ गाव काटेवाडी आहे. सर्वात दबाव काटेवाडी, कन्हेरीमध्ये झाला, इथल्या अनेक स्थानिक पुढारी यांच्याकडून झाला.
तुम्हाला सरळ सोपा प्रश्न आहे की, शरद पवार हे बारामतीचे नसते तर आज बारामती अशी असती का, असा सवाल यावेळी त्यांनी गावकऱ्यांना विचारला.
शरद पवार यांच्यामुळे बारामतीचा खरा विकास झाल्याचे यावेळी युगेंद्र पवार यांनी नमूद केले. मंत्रालयात तुम्ही काटेवाडीचे आहेत, असे सांगितलं की, लगेच खुर्ची आणि मान मिळतो. इथे दबाव होता, पैशांचा वापर झाला आहे.
पण ३ महिन्यांनी तुम्ही त्यांना दाखवून द्या की १०० मतांनी आपण पुढे कसं पाहिजे. तुम्ही अजिबात कमी पडला नाहीत, तुम्हाला धन्यवाद म्हणतो, अशा शब्दात युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत.
छत्रपती कारखाना, ठेकेदारांवर प्रहार
बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. सुनेत्रा पवार यांची बारामतीच्या होमगाऊंडवरून पीछेहाट झाली होती. त्यामुळे शरद पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शरद पवार यांचा जनसंवाद दौरा ही त्याचीच लिटमस टेस्ट आहे. या दौऱ्यात शरद पवार यांनी छत्रपती कारखाना, बारामती तालुक्यातील मलिदा गॅग, ठेकेदारांवर जोरदार प्रहार केला आहे. शरद पवार हे युगेंद्र पवार यांच्या सोबत घेत तालुका पिंजून काढला आहे. तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेची ही रंगीत तालीम मानली जात आहे.