भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणाहून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार अनियंत्रित झाल्याने आई आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही भरधाव कार रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
अपघातग्रस्त कार अपघाताच्या वेळी रायपूरकडून नागपूरच्या दिशेनं जात होती. यादरम्यान कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती डिवायडरवर आदळली. या भीषण अपघातात कार महामार्गावर विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात कारमधील वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू झालाय. तर, 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रायपूर – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साकोली येथील उड्डाण पुलावर सायंकाळच्या सुमारास घडली.
कांता गजभिये (वय 72 वर्ष) आणि डॉ. सुफलकुमार गजभिये (वय 57 वर्ष ) असं या अपघातात मृत पावलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर, शिवान गजभिये (वय 16 वर्ष) असं जखमी मुलाचं नावं असून त्याच्यावर साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे.