नगर, (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, कुर्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढणार्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
विशाल जालिंदर काटे (वय २७), विशाल दीपक कापरे (वय २२), हर्षद गौतम गायकवाड (वय २०, तिघे रा. नवनागापूर) व प्रवीण शरद गिते (वय २४रा. गिते वस्ती, विळदघाट, ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल असून उर्वरित संशयित आरोपी पसार झाले आहेत. नवनागापूर परिसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरूण सोमवारी (२४ जून) दुपारी गेले होते.
मारण्याची सुपारी घेतल्याच्या रागातून त्यांनी त्या मुलासह त्याची आई, आजी व अल्पवयीन मित्राला रॉड, कोयता, दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या आणखी एका मित्राला मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या शेजारी राहणार्या महिलेला देखील तुझा मुलगा कुठे आहे असे म्हणून अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली. त्या तरूणांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात पुन्हा रॉड, कोयता, दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली. त्यांच्या अंगावरील कपडे उतरून त्यांची धिंड काढली. मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
मारहाणीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या घटनेची दखल घेतली नाही.
जखमींची फिर्याद नोंदवून घेतली नाही. त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. दरम्यान, दुसर्या दिवशी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या जबाबावरून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.