पुणे – भीमाशंकर देवस्थान दर्शन तसेच वर्षा पर्यटनासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघातप्रवण क्षेत्रात ३० सप्टेंबरपर्यंत जाण्याला वनविभागाने बंदी केली आहे. पुणे विभागाचे उपवनसंरक्षक यांनी असा आदेश काढला आहे.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत सदर निसर्गवाटा एक जुलै पासून पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. या परिसरात भीमाशंकर देवस्थान दर्शन घेण्यासाठी तसेच वर्षा ऋतुतील आल्हाददायक परिसर आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
तथापि वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य एक तसेच वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य दोन मधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. या धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.
ही आहेत प्रतिबंधित क्षेत्रे
– कोंढवळ धबधबा जाणारे सर्व मार्ग
– चोंडीचा धबधबा खोपीवली नियतक्षेत्र
– न्हाणीचा धबधबा पदरवाडी जवळ
– सुभेदार धबधबा – नारीवली नियतक्षेत्र
– घोंगळ घाट नाला खांडस ते भीमाशंकर मार्ग
– शिडी घाट- पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद
नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई…
उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांचे वतीने भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटना वेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच परवानगीशिवाय अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.