पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – फर्गसन रस्त्यावरील एल थ्री बार प्रकरणातील तिसरी व्यक्ती तपासात निष्पन्न झाली असून, त्याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती टॉयलेट म्हणजे त्यांच्यासोबत टॉयलेटमध्ये व्हिडिओ शूटिंग करून ड्रग सेवन करणारी आहे. तो तांत्रिक तपासाच्या माध्यमातून निष्पन्न झाला.
त्याच्याकडूनच पार्टीत टॉयलेटमध्ये ड्रग घेत असलेल्या दोन जणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानेच दोघा तरुणांना ड्रग दिल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्याकडून ड्रग विक्रीचे पुढचे रॅकेट निष्पन्न होऊ शकते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून यांनी हाॅटेलचे मालक संताेष कामठे यांच्या नावाने तळमजला व पहिल्या मजल्यावर मद्यविक्री परवानाकक्षाला मंजुरी दिली हाेती; परंतु हाॅटेल चालकांनी त्यात अंर्तगत बदल करून पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करून त्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या मजल्यावर परवाना नसताना देखील त्याठिकाणी मद्य पार्टी व मद्य पुरवठा करण्यात आला. तळमजल्यावरील रेनबाे हाॅटेलमधून एल थ्री बारमध्ये जाण्यासाठी एक जिना हाेता. त्याआधारे पाेटमाळ्यावर देखील बार निर्माण करण्यात आला. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी संबंधित बांधकामावर कारवाई केली.
आफ्टर नाइट पार्टीचा ट्रेंड
गुन्ह्याच्या अनुषंगाने शहरात नाइटमध्ये सुरू असणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. इव्हेंट मॅनेजर, डीजे चालक, पब- हॉटेल अँड बार मालक यांच्याकडे याबाबत चौकशी करण्यात येत असून,
संबंधित विषयाच्या अनुषंगाने रात्री उशिराच्या पार्टीबाबत इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉटसअप पोस्ट यावर देखील देखरेख ठेवण्यात येणार आहे. विविध महाविद्यालयांत अंमली पदार्थविरोधी अभियान राबवून शिक्षकांना जागरूक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.
पोलिसांनी पोर्शे कार प्रकरणानंतर पब आणि बारवर कडक निर्बंध घातल्यावर आफ्टर नाइट पार्टीचा ट्रेंड सुरू झाला आहे. रात्री दीडनंबर पब आणि बार बंद झाल्यावर,
तसेच पोलिसांची बार बंद झाल्याची खात्री केल्यानंतर काही तासांनी तेथे पुन्हा खासगी पार्टी आयोजित करण्यात येत आहेत. यासाठी काही आयोजक व्यक्ती पब आणि बार मालकांच्या संपर्कात असतात. ते मोठ्या ग्रुपने ग्राहक पुरवतात.