पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी सराफी पेढीतून एक लाख १० हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना लष्कर परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणव अश्विन सोलंकी (वय २४, रा. कुमार श्रीधर सोसायटी, मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोलंकी यांची लष्कर परिसरातील सेंटर स्ट्रीट परिसरात रूपकला सराफी पेढी आहे. २५ जून रोजी दुपारी पाऊणच्या सुमारास एक महिला आणि साथीदार खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. चोरट्यांनी सोनसाखळी खरेदी करण्याचा बहाणा केला.
साेलंकी यांनी त्यांना एक लाख १० हजारांची सोनसाखळी दाखविली. ते पेढीतील इतर ग्राहकांशी बोलत असता, त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सोनसाखळी चोरून नेली. सोनसाखळी चोरीला गेल्यानंतर सोलंकी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.