CM Eknath Shinde | Pune Drugs Case : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचे नाव देशात चांगलेच चर्चेत आले आहे. शहरात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण घडलेलं असताना, पुणे शहरात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल 3 द लिझर लाउंज’ या पबमधील एक व्हिडिओ समोर आलाय.
या व्हिडिओत काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. या प्रकारात पुणे पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल करून 8 आरोपींना अटक केलीय. त्यानंतर पुण्यातील (विमाननगर) पुणे-नगर रस्त्यावरील हॉटेल आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे शहरातील ड्रग्जचं जाळं वाढत मोठ्या प्रमाणात पसरल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही. जोपर्यंत ड्रग्ज मुक्त शहर होत नाहीत, तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरु राहणार आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. फक्त पुणे शहरातच नाही तर पुणे, ठाणे, नाशिक आणि संपूर्ण राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल त्यांना सोडलं जाणार नाही. असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ड्रग्ज विकणाऱ्यांवर, ड्रग्ज ठेवणाऱ्यांवर तसेच ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते आणि या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करण्याचं काम जे लोक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. फक्त पुणे शहरच नाही तर पुणे, ठाणे, नाशिक आणि संपूर्ण राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल त्यांना सोडलं जाणार नाही.
ड्रग्जची पाळंमुळं उखडून फेकण्याचं काम पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त करत आहेत. ड्रग्जचे जे सप्लायर असतील आणि कोणी कितीही मोठं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. तरुण पिढी बरबाद होऊ देणार नाही.
जोपर्यंत पूर्णपणे ड्रग्ज मुक्त शहरं होत नाहीत तोपर्यंत ही बुलडोझर कारवाई चालू राहिल. जे कोणी ड्रग्ज विकत असतील त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.