मलठण, (वार्ताहर)- काळेवाडी (ता. दौंड) येथील संत ज्ञानराज साठवण तलाव खोलीकरणास नुकतीच सुरवात करण्यात आली आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेतून टाटा मोटर्स व नाम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आणि दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून तलाव खोलिकरण करण्यास सुरुवात झाली आहे.
हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मौजे काळेवाडी मधील गायरान जमिन गट नं ५४ व ५५ असणाऱ्या क्षेत्रामध्ये दोन मातीचे व दोन सिमेंट बंधारे आहेत. यामध्ये संत ज्ञानराज तलाव असून या तलावात पाणी साठल्यास शिवारातील पाण्याचे स्रोत असणारे विहीर व बोअरवेलमधील पाणी पातळी वाढण्यास खूप फायदा होतो.
हिंगणीबेर्डी व काळेवाडी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना या तलावाच्या हद्दीत असल्याने पाणीटंचाई भासत नाही. ऐन उन्हाळ्याच्या काळात व टंचाई परिस्थिती या तलावातील पाण्याची गरज भासते. त्यामुळे ग्रामस्थांनी तलाव खोलीकरणासाठी मागणी केली होती, अशी माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड यांनी दिली.