पुणे -महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित व बीसीसीआयच्या मान्यतेने होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला गुरुवार, 15 जून रोजी प्रारंभ होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली आहे.
पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी झुंजणार असून, गुरुवार, दिनांक 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार असून,
दुपारी 2 व रात्री 8 वाजता सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य मुक्त प्रवेश असून टेलिव्हिजनवरून दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरूनही हे सामने पाहता येणार आहेत.
रंगतदार प्रारंभ ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा आणि केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स या संघांमध्ये उद्या रात्री 8 वाजता उद्घाटनाची लढत रंगणार आहे. अनुभवी नौशाद शेख व अंकित बावणेसह सचिन धस, साहिल औताडे असे युवा खेळाडू असलेल्या कोल्हापूर संघासमोर संतोष जेधे यांचे मार्गदर्शन लाभलल्या पुणे संघाचे आव्हान असणार आहे.
पुणे संघात ऋतुराजसह यष्टिरक्षक सूरज शिंदे, पवन शाह, यश क्षीरगासर व अष्टपैलू रोहन दामले यांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यापूर्वी संध्याकाळी 5.30 वाजता शानदार उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यात अमृता खानविलकरसह अनेक तारे-तारकांचा समावेश आहे.
महिला खेळाडूंचे प्रदर्शनिय सामने
महिलांच्या तीन प्रदर्शनीय एमपीएल लढतींचे येत्या 25, 27 व 28 जून रोजी आयोजन करण्यात आल्याचे सांगून रोहित पवार म्हणाले, की या महिला एमपीएल लढती सकाळी होतील. पुढच्या वर्षीपासून चार संघांच्या महिलांच्या एमपीएलचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.