Pune Police | Drugs : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे.
या घटनेने आता पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
मात्र, हे प्रकरण चर्चेत असताना आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील (विमाननगर) पुणे-नगर रस्त्यावरील हॉटेल मधील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पुण्यातील ड्रग्जचं जाळं वाढत मोठ्या प्रमाणात पसरल्याचं हे या व्हिडीओवरून दिसत आहे. सध्या पोलीस या व्हिडीओचा तपास करत असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.