Amarnath Yatra | आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमरनाथ यात्रेला येणाऱ्या बाबा बर्फानी यांच्या भक्तांसाठी जम्मू सज्ज आहे. शुक्रवारी पहिली तुकडी बाल्टाल आणि पहलगामसाठी बेस कॅम्प भगवती नगर जम्मू येथून रवाना झाली. त्यानंतर आजपासून हा प्रत्यक्ष प्रवास सुरू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, “सर्व यात्रेकरूंना माझ्या हार्दिक शुभेच्छा. बाबा बर्फानीच्या दर्शन आणि उपासनेशी संबंधित हा प्रवास शिवभक्तांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण करतो. बाबांच्या कृपेने सर्व भक्तांचे कल्याण व्हावे हीच माझी इच्छा आहे. जय बाबा बर्फानी,” असे म्हणत मोदींनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला काल सकाळी जम्मू आणि काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवून जम्मूमधील अमरनाथ यात्रा बेस कॅम्पवरून रवाना केले.
पवित्र अमरनाथ यात्रा के शुभारंभ पर सभी तीर्थयात्रियों को मेरी हार्दिक शुभकामनाएं। बाबा बर्फानी के दर्शन और वंदन से जुड़ी यह यात्रा शिवभक्तों में असीम ऊर्जा का संचार करने वाली होती है। उनकी कृपा से सभी श्रद्धालुओं का कल्याण हो, यही कामना है। जय बाबा बर्फानी!
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2024
भगवती नगर येथील यात्री निवासच्या बेस कॅम्पवरून ४,६०३ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडी रवाना झाली होती. हे सर्व यात्रेकरू दुपारी काश्मीर खोऱ्यात पोहोचले, तेथे प्रशासन आणि स्थानिक लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंचा दुसरी तुकडी जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्प येथून गुहा मंदिराकडे रवाना झाली आहे. हा प्रवास 48 किलोमीटर लांबीच्या नुनवान-पहलगाम मार्ग आणि 14 किलोमीटर लांबीच्या बालटाल मार्गावरून सुरू झाला आहे. अमरनाथ यात्रेसाठी हे दोन पारंपरिक मार्ग आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मार्गांवर संबंधित उपायुक्त तसेच पोलीस आणि नागरी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यात्रेकरूंचे गट रवाना करण्यात आले.
यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सैनिक सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून यात्रेकरूंच्या मार्गावरही नजर ठेवण्यात येत आहे. या अमरनाथ यात्रेची 19 ऑगस्टला सांगता होणार आहे.
हेही वाचा:
‘आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ’; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर काँग्रेसकडून टीका