mukhyanantri ladki bahin scheme । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. ह्या योजनेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा असतांना या योजनेवरुन एका शेतकऱ्याने सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा अशी एका शेतकऱ्याने व्हिडिओ शेअर करत मागणी केली आहे.हा शेतकरी जळगावचा असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक शेतकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबद्दल भाष्य करताना दिसत आहे. व्हिडिओत शेतकरी खानदेशी बोली भाषेत बोलत आहे. शेतकऱ्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
व्हिडिओत शेतकरी म्हणाला,’मुख्यमंत्री साहेब बहिणींसाठी तुम्ही खूप चांगली योजना सुरु केली. मग मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा ना… मेव्हन्यानी तुमचं काय घोडं मारलं आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांनाही हजार पाचशे रुपये द्या’ अशी मागणी एका शेतकऱ्यांना दिले आहे.
ही योजना नेमकी काय आहे?
या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील.
21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
कधीपासून लागू होणार ही योजना?
महाराष्ट्र सरकारने मुली आणि महिलांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील. ही योजना येत्या जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.
२ लाख मुलींना लाभ मिळणार
राज्यातील ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ज्या मुली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील, त्यांचे फी माफ करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले. या योजनेंतर्गत दरवर्षी २ लाख मुलींना लाभ देण्याची योजना आहे. यासाठी दरवर्षी २ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.