T20 World Cup 2024 (USA vs Canada) : टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. डॅलसमधील ग्रँड प्रेरी स्टेडियममध्ये दोघांमधील हा सामना पार पडला. पण टी-20 वर्ल्ड कपचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात नव्हे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर? तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, ते कसं काय..? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वास्तविक, अमेरिका आणि कॅनडाचे कर्णधार अनुक्रमे भारत आणि पाकिस्तानचे आहेत. अमेरिकन कर्णधार तर भारतात क्रिकेट खेळला आहे. अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल हा भारतातील गुजरात येथील आहे, तर कॅनडाचा कर्णधार साद बिन जफर पाकिस्तानातील गुजरांवाला येथून आला आहे. अशा परिस्थितीत, आपण म्हणू शकतो की हा सामना अमेरिका आणि कॅनडा तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातच खेळला गेला आहे.
मोनांक पटेलने गुजरातकडून खेळले क्रिकेट…
मोनांक पटेल याने गुजरातकडून अंडर-16 आणि अंडर-19 क्रिकेट खेळले आहे. पण नंतर त्याने अमेरिकेत जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला. आता तो टी-20 विश्वचषकात अमेरिकेचे नेतृत्व करत आहे.
अमेरिकेची दमदार सुरूवात….
आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला रविवारी सुरूवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेने 7 गडी राखून कॅनडावर मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकांत 3 बाद 197 धावा करत विजय नोंदवला.