मुंबई – विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून, तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपले गड कायम राखले आहे.
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारामध्ये ‘काटे की टक्कर’ सुरु आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला आहे.
परब यांचा विजय होताच ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ४ पैकी २ फेरीतच अनिल परब यांनी जाहीर मतांचा कोटा गाठल्याने त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे पहिल्यापासूनच आघाडीवर होते. कोकण पदवीधरमध्ये एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या होत्या. यानंतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका मोजणीसाठी देण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये पहिल्या फेरीत भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर असून त्यांना ३५ हजार तर कॉंग्रेसच्या रमेश कीर यांना ७ हजार मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीतच डावखरे यांना १२ हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात होते. त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे रमेश कीर हे उमेदवार आहेत.
दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात ‘काटे की टक्कर’ सुरु आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे.
तर दुसऱ्या फेरीत ३४ हजार ८५३ मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. यानंतर अवैध मतांची मोजणी करून कोटा ठरवला जाणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने उमेदवारांची मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल रात्री उशिरापर्यंत लागण्याची शक्यता आहे.