Australian Prime Minister | Anthony Albanese – आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना ठार मारण्याची एका दहशतवाद्याने धमकी दिली असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲंथनी अल्बानीज यांनी दिली. जॉर्डन पॅटन असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचे समोर आले असून,
केवळ १९ वय असलेला हा तरूण चाकू आणि काही घातक शस्त्रांसह बुधवारी न्यूकॅसलच्या संसद टीमच्या क्रँकेथॉर्प मधील कार्यालयात शिरला होता आणि त्याने तेथे एक व्हिडिओही तयार केला.
एबीसी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार पॅटनने कथितपणे एका मोठ्या हल्ल्याची तयारी केली होती. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना अल्बानीज म्हणाले ही बाब चिंताजनक आहे. त्याने केवळ लेबर पक्षाचे नेतेच नाही तर मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
दरम्यान, पॅटनने अलिकडेच कट्टरपंथी विचारधारेचा पुरस्कार करणारी एक दोनशे पानी पुस्तिकेचे वाटप केले होते. त्याने स्वत:च सात मिनिटांचा व्हिडिओ तयार करून या सगळ्याची माहिती दिली आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता तो शस्त्रे घेऊन संसदीय पथकाच्या कार्यालयात घुसला होता.
जरी त्याच्या कृत्यामुळे कोणत्या सदस्याला इजा झाली नसली तरी या प्रकारामुळे सदस्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. सदस्यांची सुरक्षा वाढवली जाईल मात्र प्रत्येक संभाव्य धोक्यापासून सुरक्षा करणे शक्य नसल्याचेही मानले जाते आहे.