मॉस्को : रशियाच्या दक्षिणेकडील दगेस्तान प्रांतात सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 15 पोलीस आणि काही सामान्य नागरिक ठार झाले आहेत. मरण पावलेल्या नागरिकांमध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरूचाही समावेश आहे. रविवारी हा हल्ला झाला, असे दगेस्तानचे गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी व्हिडीओ संदेशात सांगितले.
काही सशस्त्र बंदुकधाऱ्यांनी दोन शहरातील दोन ऑर्थोडक्स चर्च, एक सेनगॉग आणि पोलीस नाक्यांवर गोळीबार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रामुख्याने मुस्लिम बहुल लोकवस्तीमध्ये आणि दहशतवादी कारवायांचा इतिहास असलेल्या भागांमध्ये हे हल्ले झाल्याचे रशियातील नॅशनल ऍन्टी टेरेरिझम कमिटीने म्हटले आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस या दहशतवादी हल्ल्याचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
कॅस्पियन समुद्राच्या किनारी असलेल्या डेरबेन्ट शहरात सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाने एक सेनगॉग आणि चर्चवर गोळीबार केला. यामुळे चर्च आणि सेनगॉग या दोन्ही इमारतींना आग लागली. त्याचवेळी दागेस्तानची राजधानीचे असलेल्या माखाचकाला स शहरातील एक चर्च आणि वाहतूक पोलीस नाक्यावरही अशाच हल्ल्याचे वृत्त आले, असे दागेस्तान प्रांताच्या गृहमंत्र्यांनी सांगितले.
या हल्ल्यांचे वृत्त समजताच प्रशासनाने दहशतवाद विरोधी कारवाईचे आदेश दिले. या कारवाईमध्ये 5 दहशतवादी मारले गेले, असे ऍन्टी टेरेरिझम कमिटीने म्हटले आहे. तर ६ दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे स्थानिक गव्हर्नरांनी सांगितले. हल्लेखोरांच्या संख्येतील तफावत लगेच दूर केली जाऊ शकली नाही. या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी त्वरित कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
दहशतवादी कायद्यांतर्गत या हल्ल्यांच्या तपासाचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या हल्ल्यात दागेस्तानमधील एका अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याच्या आरोपावरून या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही शहरांमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. या दहशतवादी हल्ल्यामागील सर्व सूत्रधारांचे साथीदार सापडत नाहीत, तोपर्यंत तपास सुरू राहिल, असेही गव्हर्नरांनी म्हटले आहे.