पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका रुग्णालयात चहा विक्रीसाठी येणारा तरुण डॉक्टरांचे स्टेथॉस्कोप गळ्यात घालून रुग्णांना आपण डॉक्टर असल्याचे भासवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून महापालिकेच्या रुग्णालयात बाहेरील खासगी व्यक्तींना खाद्यपदार्थ विक्रीस बंदी केली आहे. हा प्रकार पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात नुकताच घडला.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, जिजामाता रुग्णालयात बाहेरुन खाद्यपदार्थ विक्रीला येणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आला होता.
मात्र, एका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने रुग्णालयात एका विक्रेत्याला परवानगी देण्यात आली होती. त्याला अडवायचे नसल्याबाबत सुरक्षारक्षकांना सांगण्यात आले होते.
या विक्रेता तरुणाची रुग्णालयात मनमानी सुरु होती. अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये हा तरुण तासनतान बसून असायचा, शिशुंच्या आयसीयुमध्ये थेट जात होता, कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करत असते, डॉक्टरांचे स्टेथॉस्कोप गळ्यात घालून तो डॉक्टर असल्याचे भासवत होता. त्याचे हे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले. ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.
दरम्यान, नढे यांनी महापालिका आयुक्तांनी भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला, त्यानंतर आयुक्तांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना याबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
या प्रकरणी डॉ. गोफणे यांनी महापालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना लेखी पत्र देत महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बाहेरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना बंदी घालण्याच्या सुचना दिल्या.
या घटनेच्या अनुषंगाने दोन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समजली आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.