Jay Shah On Team India New Head Coach : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, आता राहुल द्रविडच्या जागी नवे मुख्य प्रशिक्षक लवकरच टीम इंडियात सामील होणार आहेत. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत गौतम गंभीर आणि डब्ल्यू.व्ही. रमन आघाडीवर आहेत. लवकरच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, असे मानले जात आहे. पण आता भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक संघाशी कधी जोडणार, हा प्रश्न आहे. या प्रश्नाला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह नवीन प्रशिक्षकावर काय म्हणाले?
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्त्याची नावे लवकरच जाहीर केली जातील. सर्व मुलाखती आणि प्रक्रियेनंतर दोन नावांवर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआय सचिव म्हणाले की, भारताचे नवे प्रशिक्षक श्रीलंका मालिकेपासून संघात सामील होतील. झिम्बाब्वे दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सोबत असतील असेही त्यांनी सांगितले. भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह मीडियाशी बोलत होते.
राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त…
राहुल द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत होता. त्यामुळे आता राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 6 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता ठरला.
याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. पण यानंतर टीम इंडियाला तब्बल 17 वर्षे वाट पाहावी लागली. अखेरीस, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकण्यात यश आले.