नाशिक : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील जंगलामध्ये हैदोस घालणाऱ्या कुख्यात लाकूड तस्कराला वन विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने जंगलात घुसखोरी करून साग आणि खैर झाडाची कत्तल करून लाकडाची तस्करी सुरु होती. मूळचा गुजरातमधील असणारा कुख्यात तस्कर नवसुभाई लोहारचा ‘पुष्पा’ नावाने तस्करीत दबदबा होता. वन विभाग मागच्या १० वर्षांपासून त्याच्या मागावर होते मात्र तो त्यांच्या हाती लागत नव्हता. अखेर वन विभागाला त्याला पकडण्यात यश आले. सध्या त्याला पाच दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
साग आणि खैराची तस्करी
वन विभागाचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक सुजित नेवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गाव आणि परिसरात ‘पुष्पा’ या नावाने ओळखला जातो. तो ‘पुष्पा’ चित्रपटातील पात्राप्रमाणे दहशत माजवण्याचा आणि समाजामध्ये चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो. काही दिवसांपूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कष्टडी दिली आणि पुन्हा वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आहे.
व्यापाऱ्यांवरही केली जाणार कारवाई
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भागात आणखी अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेली आहेत. तसेच गुजरातमधील व्यापाऱ्यांना या लाकूड तस्करांकडून पुरवठा होत होता, त्यामुळे व्यापाऱ्यांवरही पोलिसांकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.