T20 World Cup 2024 Prize Money : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले. टीम इंडियासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या चॅम्पियन संघाला सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. यासोबतच सुपर 8 मध्ये विजयी झालेल्या संघांनाही पैसे मिळाले आहेत.
2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेले संघ मालामाल झाले आहेत. या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स ठेवण्यात आली होती. भारतीय चलनानुसार याचे मूल्य 93.51 कोटी रुपये आहे. टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे. टीम इंडियाला 2.45 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 20.36 कोटी रुपये मिळाले आहेत. यासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही मोठी रक्कम मिळाली आहे. आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. उपविजेत्या आफ्रिकेला बक्षीस म्हणून 10.64 कोटी रुपये मिळाले आहेत.
उपांत्य फेरीत पोहोचलेले संघही झाले मालामाल..
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून 6.55 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही बक्षीस मिळाले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला म्हणजेच सुपर 8 मधील संघांना 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत.
शेवटच्या स्थानावर असलेल्या संघालाही बक्षीस…
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या संघालाही बक्षीस रक्कम मिळाली आहे. यामध्ये 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.05 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये मिळाले आहेत.
तसेच प्रत्येक संघाला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील प्रत्येक सामन्याच्या विजयासाठी 25.89 लाख रुपये मिळाले आहेत. उदा. टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाण संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. आता त्यांच्या संघाला 6.55 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीपर्यंत त्याने पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना 25.9*5= 129.5 लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे, अफगाणिस्तानला टी-20 विश्वचषकात एकूण 7.84 कोटी रुपये बक्षीस मिळाले आहे.
सुपर 8 च्या ग्रुप 1 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर टीम इंडिया येथे अव्वल स्थानावर होती. तर अफगाणिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर गट 2 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल तर इंग्लंड संघ दुसऱ्या क्रमांकावर होता.