T20 World Cup 2024 (Super 8, AUS vs BAN,Pat Cummins Hat Trick) – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ब्रोकन हॅट्ट्र्रिक घेतली. कोणत्याही गोलंदाजासाठी तीन चेंडूत तीन बळी मिळवणे याला हॅटट्रिक संबोधतात. कमिन्सही आपली ब्रोकन हॅट्ट्र्रिक झाली आहे हे विसरूनच गेला.
तीन चेंडूत तीन बळी पटकावले की हॅट्ट्र्रिक होते. पण एका षटकात दोन बळी मिळवले व पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळला तरी ही हॅट्ट्र्रिकच ठरते, पण याला ब्रोकन हॅट्ट्र्रिक म्हटले जाते. एकाच षटकात सलग तीन चेंडूत तीन बळींऐवजी दोन षटकात मिळून घेतलेल्या हॅटट्रिकला ब्रोकन हॅट्ट्र्रिक म्हटले जाते. कमिन्सच्या बाबतीत हेच घडले.
कमिन्सने बांगलादेशच्या डावात 18 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महमदुल्लाला त्रिफळाचीत केले. महमदुल्लाचा पूल करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू स्टंप्सवर जाऊन आदळला. पुढच्याच चेंडूवर मेहदी हसनने कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर अपर कट मारला. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि एडम झंपाने सुरेख झेल टिपला. मेहदीला भोपळाही फोडता आला नाही. या विकेटसह 18 वे षटक संपले.
यानंतर जोश हेझलवूडने 19 वे षटक टाकले. बांगलादेशच्या फलंदाजांनी या षटकात 11 धावा काढल्या. हेझलवूडने या षटकात एकही बळी मिळाला नाही. त्याने 4 षटकात 25 धावा दिल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी कमिन्स आला. कमिन्स पहिल्या चेंडूआधी हॅट्ट्र्रिकवर होता. पण 10 मिनिटात कमिन्स विक्रमच विसरुनही गेला होता.
Pat Cummins didn’t remember he was on a hat-trick 😀 https://t.co/ZFH3nZ2l9B #AUSvBAN #T20WorldCup pic.twitter.com/dQbS0pLPmt
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 21, 2024
तौहिद हृदॉयने कमिन्सच्या स्लोअरवन चेंडूवर स्कूप करण्याचा प्रयत्न केला कारण फाईनलेगचा क्षेत्ररक्षक थर्टी यार्ड वर्तुळात होता. तौहिदचा प्रयत्न फसला आणि जोश हेझलवूडने शॉर्ट फाईनलेगला झेल घेतला. सहकाऱ्यांनी कमिन्सच्या दिशेने धाव घेत त्याचे कौतुक केले. मैदानात हॅट्ट्र्रिकची घोषणा आणि फलक झळकताच कमिन्सने चाहत्यांना अभिवादन केले.
टी20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्र्रिक करणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत ब्रेट ली याने बांगलादेशविरुद्धच हॅट्ट्र्रिक घेतली होती. कमिन्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने गटवार लढतीत चारपैकी चारही सामन्यात विजय मिळवला होता. सुपर 8 च्या पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला नमवत दमदार सलामी दिली.