T20 World Cup 2024 (Super 8, USA vs ENG) : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतल सुपर एट टप्प्यात आज (रविवारी) गतविजेता इंग्लंडचा सामना अमेरिकेशी झाला. इंग्लंडसाठी हा सामना ‘करा किंवा मरो’ असा होता. या सामन्यात इंग्लंडने 62 चेंडू शिल्लक ठेऊन आणि 10 गडी राखून अमेरिकेचा पराभव केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना, अमेरिकेने 18.5 षटकांत 115 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने केवळ 9.4 षटकांत कोणतेही नुकसान न करता 117 धावा करून सामना जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडकडून बटलरने 38 चेंडूंत सहा चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या तर फिल सॉल्टने 21 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. जोस बटलर आणि फिलिप सॉल्टची सलामीची भागीदारी अमेरिकेच्या गोलंदाजांना तोडता आली नाही. कर्णधार बटलरने 83 धावांची जलद खेळी करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान, हरमीत सिंगच्या एकाच षटकात त्याने 5 षटकार ठोकले. हरमीतच्या षटकात एकूण 32 धावा आल्या.
या दणदणीत विजयासह, इंग्लंड संघ सुपर एट टप्प्यातील गट 2 मध्ये दोन विजय आणि एक पराभवासह तीन सामन्यांतून चार गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा निव्वळ रन रेट +1.992 झाला जो दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजपेक्षा चांगला आहे. त्याचबरोबर ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अमेरिकन संघाची कामगिरी सुपर एटमध्ये निराशाजनक राहिली आणि संघाने आपले तिन्ही सामने गमावले आणि अमेरिका स्पर्धेबाहेर पडला.
The reigning champions move one step closer to defending their title 🔥
England become the first team to book a spot in the #T20WorldCup 2024 semi-finals 👏#USAvENG | 📝: https://t.co/a9ojDCSPBJ pic.twitter.com/AFcV8HYaKq
— ICC (@ICC) June 23, 2024
इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली….
यूएसए विरुद्धच्या विजयासह, इंग्लंड टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. तिन्ही सामने खेळल्यानंतर इंग्लंड आता सुपर-8 च्या ब गटात अव्वल स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज हा या गटातील शेवटचा सामना असल्याने त्यापैकी एकच संघ उपांत्य फेरीत जाऊ शकणार आहे. इंग्लंड सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्याने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
England thrash USA to seal their spot in the #T20WorldCup semi-finals! 🏴 pic.twitter.com/0KwC0QqJNm
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 23, 2024
तत्पूर्वी, इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत अमेरिकेला 18.5 षटकात केवळ 115 धावांवर रोखले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु अमेरिकेची फलंदाजी अत्यंत खराब झाली. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक 30 धावा केल्या आणि कोरी अँडरसनने 29 धावा केल्या. अँडरसनने हरमीत सिंगसोबत सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली, पण हरमीत बाद होताच अमेरिकेचा डाव पत्त्यासारखा गडगजला. हरमीतने 21 धावांचे योगदान दिले.
Chris Jordan becomes the first English player to take a hat-trick at a T20 World Cup 💥
Some way to finish off the USA innings…#EnglandCricket | #ENGvUSA pic.twitter.com/zcC8Qd8JDP
— England Cricket (@englandcricket) June 23, 2024
19 वे षटक टाकायला आलेल्या जॉर्डनने पाच चेंडूत चार बळी घेत अमेरिकेचा डाव लवकर गुंडाळला. जॉर्डनने 19 व्या षटकात कोरी अँडरसन(18.1) ,अली खान(18.3), नॉथुश केन्झिगे(18.4) आणि सौरभ नेत्रावलकर(18.5) यांना बाद केले. अली, केंजिगे आणि नेत्रावळकर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. अमेरिकेच्या केवळ पाच फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने एका षटकात हॅटट्रिकसह 4 बळी घेतले. त्याने 2.5 षटकात 10 धावा देत 4 बळी घेतले. तर लेगस्पिनर आदिल रशीदने 4 षटकात केवळ 13 धावा देऊन दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय सॅम करनलाही दोन यश मिळाले. रीस टॉप्ली आणि लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.