T20 World Cup 2024 (Super 8, SA vs ENG) : हॅरी ब्रूकचे अर्धशतक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या झंझावाती खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा सात धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 163 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ब्रूकने 37 चेंडूत 53 धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले, मात्र अखेरच्या षटकात त्याने आपली विकेट गमावली आणि इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयासाठी 164 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 बाद 156 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
ब्रूक-लिव्हिंगस्टोनची शानदार भागीदारी
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 61 धावांत चार विकेट गमावल्या होत्या.सततच्या धक्क्यांनंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी इंग्लंडचा डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव आणला. ब्रूक आणि लिव्हिंगस्टोन यांच्यात पाचव्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे इंग्लंड कठीण परिस्थितीतून बाहेर पडला आणि मजबूत स्थितीत आला. मात्र, रबाडाने लिव्हिंगस्टोनला बाद करत ही भागीदारी तोडली आणि दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले.
लिव्हिंगस्टोन 17 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 14 धावांची गरज होती आणि पहिल्याच चेंडूवर ब्रुकला बाद करून ॲनरिक नॉर्टजेने इंग्लंडला मोठा धक्का दिला.त्यानंतर सॅम कुरनने चौकार मारला, पण दुसऱ्या टोकाला त्याला साथ देणारे कोणी नव्हते.अखेरीस इंग्लंडच्या संघाला हा रोमांचक सामना जिंकता आला नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा बळकट झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने सुपर एट टप्प्यातील सलग दुसरा सामना जिंकून दोन सामन्यांतून दोन विजय मिळवून चार गुणांसह गट दोनमध्ये अव्वल स्थान पटकावले. या पराभवानंतरही इंग्लंडचा संघ दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 टप्प्यातील सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर आणि प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकचे अर्धशतक आणि डेव्हिड मिलरच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
झंझावाती सुरुवात करूनही दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध 20 षटकात 163 धावाच करू शकला. क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. एकवेळ धावसंख्या एकही विकेट न पडता 86 धावा अशी होती. त्यानंतर आफ्रिकन संघ सहज 200 चा टप्पा पार करेल असे वाटत होते, मात्र मधल्या फळीतील फलंदाज अपयशतती ठरल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Led by skipper Jos Buttler’s sensational fielding efforts, England have restricted South Africa to 163/6 in St Lucia 🙌#T20WorldCup | #ENGvSA | 📝: https://t.co/lN9ItA7ich pic.twitter.com/Vfq2vUVmYh
— ICC (@ICC) June 21, 2024
दक्षिण आफ्रिकेसाठी डी-कॉकने शानदार फलंदाजी केली आणि रीझा हेंड्रिक्ससह पहिल्या विकेटसाठी 86 धावा जोडल्या, परंतु हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. डी कॉकने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील संयुक्त जलद अर्धशतक आहे. डी कॉक 38 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 65 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, परंतु मिलरने दुसऱ्या टोकाकडून संघाचा डाव संभाळला आणि संघाची धावसंख्या 160 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिलरने विकेट गमावली. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्याने 28 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण 43 धावा केल्या. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेचे महत्वाचे फलंदाज रीझा हेंड्रिक्स (19 धावा), हेनरिक क्लासेन (8 धावा) आणि एडन मार्कराम (1 धावा) झटपट बाद झाले. आयपीएल 2024 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ट्रस्टन स्टब्सला 11 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ 12 नाबाद धावा करता आल्या. त्याच्यासह केशव महाराज दोन चेंडूत पाच धावा करून नाबाद माघारी परतला.
इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 बळी घेतले. मात्र, तो बराच महागडा ठरला. आर्चरने 4 षटकात 40 धावा दिल्या. लेगस्पिनर आदिल रशीद अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकात फक्त 20 धावा देत एक विकेट घेतली. तर रीस टोपलीने चार षटकांत 23 धावा दिल्या. मोईल अलीला एक विकेट मिळाली, त्याने 3 षटकात 25 धावा दिल्या.