T20 World Cup 2024 (Super 8, SA vs WI) – अटीतटीच्या उत्कंठावर्धक लढतीत दक्षिण आफ्रिकेने यजमान वेस्ट इंडिजवर ३ गडी राखून मात केली व उपांत्य फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेचा हा स्पर्धेतील हा सलग सातवा विजय ठरला. तर दुसरीकडे या पराभवाने यजमान वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गट २ मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीमध्ये आगेकूच केली आहे.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात कठीण अशा खेळपट्टीवर वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 135 धावसंख्येपर्यंतच मजल करू शकला. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचीही घसरण झाली. पण तणावपूर्ण स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमाने खेळ करत बाजी मारली.
पावसामुळे सामना 17 षटकांचा करण्यात आला व विजयासाठी आफ्रिकेसमोर 123 धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले. 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कागिसो रबाडाने चौकार खेचला तर शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला 5 धावांची आवश्यकता होती. मार्को यान्सनने ओबेड मेकॉयच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
What a finish in Antigua 🥵
The Proteas go through to the #T20WorldCup Semi-Finals 🌟#WIvSA 📝 https://t.co/Gv3hNXD6c4 pic.twitter.com/tWbznVDrIk
— ICC (@ICC) June 24, 2024
वेस्ट इंडिजच्या डावात रॉस्टन चेसने साकारलेली 52 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. काईल मेयर्सने 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 65 चेंडूत 81 धावांची भागीदारी केली. या दोघांचा अपवाद वगळता वेस्ट इंडिजच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे तबरेझ शम्सीने 3 बळी पटकावले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे रीझा हेन्ड्रिक्स, क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम हे लवकर बाद झाले. हेनरिच क्लासन आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरला. क्लासनने गुदकेश मोतियेच्या षटकात चौकार-षटकारांसह 20 धावा वसूल केल्या. यामुळे लक्ष्य आटोक्यात आले. मात्र अल्झारी जोसेफच्या उसळत्या चेंडूवर क्लासन बाद झाला. त्याने 22 धावा केल्या. यानंतर स्टब्सच्या साथीला डेव्हिड मिलर आला. फिनिशर मिलरला एकेक धावेसाठी संघर्ष करावा लागला.
रॉस्टन चेसने त्याला त्रिफळाचीत केले. चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा स्टब्सचा झेल मेयर्सने अचुक घेतला. प्रमुख फलंदाज माघारी परतल्याने दक्षिण आफ्रिकेची चिंता वाढली. त्यातच केशव महाराजही बाद झाला. चेसनेच त्याला बाद केले. धावा आणि चेंडूचं प्रमाण नियंत्रणात असल्याने कागिसो रबाडा आणि मार्को यान्सन यांनी हिरिरीने खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजकडून चेसने 3 तर आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. तीन विकेट्स पटकावणाऱ्या शम्सीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज – 20 षटकांत 8 बाद 135 धावा. (रॉस्टन चेस 52, कायल मायर्स 35, तबरेझ शम्सी 3-27). दक्षिण आफ्रिका – 16.1 षटकांत 7 बाद 124 धावा. (ट्राटस्टन स्ट्रब 29. होनरीच क्लासेन 22, मार्को जेन्सन नाबाद 21, रॉस्टन चेस 3-12, आंद्रे रसेल 2-19, अल्झारी जोसेफ 2-25) (डकवर्थ लुइस नियमानूसार दक्षिण आफ्रिका विजयी).