T20 World Cup 2024 (Super 8, AUS vs BAN) : टी-20 विश्वचषक 2024 च्या 44 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियम (DLS Rule) अंतर्गत बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. दोन्ही संघांचा सुपर-8 टप्प्यातील हा पहिलाच सामना होता. पावसामुळे सामना अनेकदा अडचणीत आला, त्यामुळे डीएलएसचा अवलंब करून सामन्याचा निकाल लावावा लागला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर बांगलादेश संघाला 20 षटकात केवळ 140 धावांपर्यंत मजल मारता आली.कर्णधार शांतोने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळताना 36 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यातील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर पॅट कमिन्सनं चमकदार कामगिरी केली, ज्याने 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, ज्यात त्याने हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. कमिन्सशिवाय ॲडम झाम्पाने 2 तर स्टार्क, स्टॉइनिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या डावात दोनदा पावसाचा व्यत्यय पडला. पहिल्यांदा 7व्या षटकात पावसाने व्यत्यय आणला, मात्र काही वेळाने सामना सुरू झाला. खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 6.2 षटकात एकही विकेट न गमावता 64 धावा केल्या होत्या. त्यानंतर 12व्या षटकात दुसऱ्यादा पावसाने हजेरी लावली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकात 2 बाद 100 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. यावेळी, डेव्हिड वॉर्नर 35 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 53* धावा करून तर ग्लेन मॅक्सवेल 6 चेंडूत 1 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 14* धावासह खेळपट्टीवर उपस्थित होते. यावेळी पाऊस थांबला नाही आणि सामन्यात पुढे असल्याने ऑस्ट्रेलियाने DLS अंतर्गत (डकवर्थ-लुईस नियम) 28 धावांनी विजय मिळवला.
Rain stops play in Antigua but Australia add two crucial Super Eight points in the bag 🙌#T20WorldCup | #AUSvBAN | 📝: https://t.co/UO8a8vKydZ pic.twitter.com/qXVO3WgJCt
— ICC (@ICC) June 21, 2024
बांगलादेशची गोलंदाजी ठरली कमकुवत …
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियासमोर बांगलादेशची गोलंदाजी खूपच असहाय्य दिसत होती. 141 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सहज धावा करत होते. मात्र, बांगलादेशचा फिरकी गोलंदाज रिशाद हुसेनने कांगारू फलंदाजांना अडचणीत आणत 2 बळी घेतले. रिशादने ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्शला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेडने 21 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या, तर कर्णधार मार्शला 6 चेंडू खेळून केवळ 01 धाव करता आली. रिशादशिवाय बांगलादेशच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात सर्वबाद 140 धावा (नजमुल हुसेन शांतो 41(36), तौहीद हृदोय 40(28), पॅट कमिन्स 3-29, अॅडम झम्पा 2-24) Vs ऑस्ट्रेलिया 11.2 षटकात 2 बाद 100 (डेव्हिड वाॅर्नर 53*(35), ट्रव्हिस हेड 31(21), ग्लेन मॅक्सवेल 14*(06), रिशाद हुसेन 23-2)