T20 World Cup 2024 (SA vs AFG,SemiFinal 1) : टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचत 7 वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर आठव्या प्रयत्नात प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 56 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून हेंड्रिक्सने नाबाद 29 तर मार्करामने नाबाद 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. क्विंटन डी कॉक 5 धावांवर माघारी परतल्यानंतर रिझा आणि एडन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी याने एकमेव विकेट घेतली.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तान सपेशल अपयशी ठरली. अफगाणिस्तानला धड 12 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 11.5 षटकांत 56 धावांवर गुंडाळलं. अफगाणिस्तानसाठी एकट्या अझमतुल्लाह याने दुहेरी आकडा गाठला. अझमतुल्लाहने सर्वाधिक 10 धावा केल्या. तिघांना खातंही उघडता आलं नाही.
सलामीवीर गुरबाज शून्यावर बाद झाला. यानंतर झद्रान अवघ्या 2 धावा करून बाद झाला. गुलाबदीन नईब 9 धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीलाही खाते उघडता आले नाही. करीम जनत 8 धावा करून बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. जॉन्सनने 3 षटकात फक्त 16 धावा दिल्या. तर शम्सीने 1.5 षटकात 6 धावा दिल्या. कागिसो रबाडाने 3 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले. नॉर्खियाने 3 षटकात 7 धावा देत 2 गडी बाद केले.