T20 World Cup 2024 (SA vs AFG Semi-final 1) : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. स्थानिक वेळेनुसार, हा सामना बुधवार, 26 जून रोजी रात्री 8.30 वाजता खेळवला जाईल. मात्र, भारतीय वेळेनुसार गुरुवारी 27 जून रोजी सकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. या सामन्यासाठी, दोन्ही संघ आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतील.
अफगाणिस्तानसाठी कोणत्याही विश्वचषकाची ही पहिली उपांत्य फेरी असेल. अफगाणिस्तानने साखळी फेरीत न्यूझीलंड तर सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने एकही सामना न गमावता उपांत्य फेरी गाठली आहे.
या सामन्यात आफ्रिकेचे पारडं जड आहे, पण स्पर्धेत लढाऊ संघाप्रमाणे लढणारा अफगाणिस्तानही कोणत्याही अर्थाने कमी नाही. या सामन्यात अफगाणिस्तानपेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर जास्त दडपण असेल, कारण चोकर्सचा टॅग आफ्रिकन संघावर वर्षानुवर्षे लागलेला आहे, जो आजतागायत हटलेला नाही.
इकडे संपूर्ण विश्वचषकात अफगाणिस्तानने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ते पाहता आफ्रिकेवरही काही प्रमाणात दबाब असेल. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. अफगाण संघ हा मोठा सामना निर्भयपणे खेळण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असेल.
खेळपट्टी अहवाल …
ब्रायन लारा स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. या स्टेडियममध्ये आतापर्यंत टी-20 विश्वचषक 2024 चे 4 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी फक्त एका सामन्यात (श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स) 200 धावांचा टप्पा पार झाला होता. याशिवाय उर्वरित सामन्यात संघाला 106 धावांचा आकडाही गाठता आला नाही. ब्रायन लारा स्टेडियमवर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची पंसती ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याची असेल.
ब्रायन लारा स्टेडियमवरील टी-20 क्रिकेट सामन्याची आकडेवारी…
एकूण सामने- 11
प्रथम फलंदाजी करताना विजयी सामने – 4
प्रथम गोलंदाजी करताना विजयी सामने – 7
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या – 135
दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या – 122
सर्वोच्च धावसंख्या- 267/3 (इंग्लंड वि. वेस्ट इंडिज)
सर्वात कमी धावसंख्या – 40/10 (युगांडा वि. न्यूझीलंड)
सामन्यादरम्यान कसे असेल हवामान..?
हवामान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास उष्ण असेल. दिवसभरात पावसाची शक्यता आहे. तथापि, संध्याकाळी म्हणजे सामन्याच्या वेळी कोणत्याही प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना संपूर्ण उपांत्य फेरीचा आनंद घेता येईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड (T20 आंतरराष्ट्रीय)
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. आफ्रिकेने दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचा सामना जिंकणे सोपे नसेल.
विनामूल्य व लाइव्ह सामना कुठे पाहता येईल?
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणारा उपांत्य सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर होईल, जे तुम्ही मोबाईलवर ‘विनामूल्य’ पाहू शकता.
SA vs AFG : दोन्ही संघाचे संभावित प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
SA : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, मार्को जॉन्सन.
AFG : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.