T20 World Cup 2024 (NZ vs PNG) :- न्यूझीलंडने ‘क’ गटातील अंतिम व स्पर्धेतील 39 सामन्यात पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव करून विजयासह टी-20 विश्वचषक स्पर्धीत आपल्या मोहिमेचा विजयी शेवट केला आहे. मॅचचा सर्वात मोठा हिरो लॉकी फर्ग्युसन होता, ज्याने आपल्या स्पेलची चारही षटके निर्धाव (मेडन) टाकली आणि 3 विकेट्सही घेतल्या.
विजयासाठी 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरले तेव्हा फिन ॲलन (00) आणि रचिन रवींद्र (06) लवकर बाद झाले, पण डेव्हॉन कॉनवेने 32 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी अनुक्रमे नाबाद 18 आणि 19 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला. न्यूझीलंडने 12.2 षटकात 3 विकेट गमावत 79 धावा करून विजय मिळवला आणि टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेचा विजयासह शेवट केला.
तत्पूर्वी, पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पापुआ न्यू गिनीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम खेळताना पापुआ न्यू गिनी अवघ्या 78 धावांत गारद झाली. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने क गटातील सामन्यात पापुआ न्यू गिनीला 19.4 षटकांत 78 धावांत गुंडाळले. संघाचे केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले आणि चार्ल्स अमिनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 25 चेंडूत 17 धावांची खेळी खेळली.
न्यूझीलंडकडून फर्ग्युसनने चार षटकांत एकही धाव न देता तीन बळी घेतले, तर ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये चारही मेडन ओव्हर टाकणारा फर्ग्युसन जगातील दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी कॅनडाच्या साद बिन जफरने 2021 मध्ये पनामाविरुद्ध चार षटकात एकही धाव न देता दोन बळी घेतले होते.
दरम्यान, न्यूझीलंड संघाने क गटात चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह तिसरे स्थान पटकावले, तर पापुआ न्यू गिनी संघाला स्पर्धेतील एकही सामना जिंकता आला नाही.
ट्रेंट बोल्ट झाला निवृत्त….
न्यूझीलंडचा क्रिकेटर ट्रेंट बोल्टचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना होता. त्याच्या शेवटच्या सामन्यात त्याने 4 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले.
न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर बोल्ट म्हणाला की,”देशासाठी खेळणे ही त्यांच्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब होती. त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असल्याचे त्याने सांगितले. त्याने टीम साऊदीसोबतची आपली मैत्री आणि त्याच्यासोबत 12 वर्षे खेळणे ही सन्मानाची बाब असल्याचेही सांगितले. आपला संघ विश्वचषकाच्या पुढील टप्प्यात पोहोचू शकला नाही म्हणून बोल्ट निराश झाल्याचे दिसून आले.”