T20 World Cup 2024 ( IND vs PAK, Match No 19 ) :- मोहम्मद नवाजच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने धाव घेतली आणि भारतीय संघाने पाकिस्तानवर 4 विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवला. अश्विनसह त्यावेळी क्रीजवर असलेला विराट कोहली(82 धावा) भारतीय विजयाचा सर्वांत मोठा हिरो ठरला. ही घटना 2022 मध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 विश्वकरंडकातील भारत-पाकिस्तान सामन्याची आहे. त्या सामन्याचा निर्णय शेवटच्या चेंडूवर झाला होता, परंतू याच स्पर्धेत आता रविवारी भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने येतील तेव्हा सामन्याचा निकाल, बहुतांशी नाणेफेकीच्या कौलावर अवलंबून असणार आहे.
टी-20 विश्वकरंडकात भारताचा पाकिस्तान संघावर वरचष्मा राहिला आहे. मात्र जर आपण रेकॉर्डवर नजर टाकली तर, 2007 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व टी-20 विश्वकरंडक सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. अशा प्रकारे भारत-पाक सामन्यात नाणेफेक निर्णायक ठरणार आहे.
टी-20 विश्वकरंडकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. 2007 नंतर पासून टी-20 विश्वकरंडकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामने खेळले गेले आहेत. 2009 आणि 2010 मध्ये दोघांमध्ये एकही सामना झाला नव्हता. 2012 च्या विश्वकरंडकापासून आतापर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध 4 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. त्याचबरोबर 2021 च्या टी-20 विश्वकरंडकात भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने एका सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला होता.
टी-20 विश्वकरंडकात भारत वि. पाक
१. २०१२ः भारत ८ विकेट्सनी विजयी
२. २०१४ः भारत ७ विकेट्सनी विजयी
३. २०१६ः भारत ६ विकेट्सनी विजयी
४. २०२१ः पाकिस्तान १० विकेट्सनी विजयी
५. २०२२ः भारत ४ विकेट्सनी विजयी
द्रविड-आगरकरांची डॉ.आंबेडकरांना आदरांजली
भारतीय संघाने टी-२० विश्वकरंडकात आयर्लंडवर विजय मिळवल्यानंतर काहीश्या रिलॅक्स मूडमध्ये असलेले टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न्यूयॉर्कमध्ये आदरांजली वाहिली. कोलंबिया विद्यापीठातले या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. विशाल मिश्रा नावाच्या एका नेटकऱ्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.
रोहितला पुन्हा दुखापत
रोहित शर्माच्या अंगठ्याला आता दुखापत झाली आहे. भारतीय कर्णधाराला नेटमध्ये ही दुखापत झाली. तो नेटमध्ये श्रीलंकेच्या थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवानविरुद्ध सराव करत असताना चेंडू विचित्रपणे उसळला आणि त्याच्या हाताला लागला. रोहित वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर फिजिओने लगेच येऊन तपासणी केली. यानंतर रोहितने काही काळ दुसऱ्या टोकाकडून फलंदाजी केली आणि नंतर नेटच्या बाहेर गेला. त्यानंतर कर्णधार पूर्णपणे बरा झाला आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
पाकची लाजीरवाणी सुरूवात..
यंदाच्या विश्वकरंडकात बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली आहे. कारण, पहिल्याच सामन्यात पाकला नवख्या अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. ६ जून रोजी डल्लासच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव करून या स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला.