T20 World Cup 2024 (IND vs SA Final, Score Update) : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषक 2024 चा विजेतेपदाचा सामना खेळला जात आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
अंतिम सामन्यात टाॅस जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकी आणि अक्षर पटेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला विश्वविजेतेपदासाठी 177 धावांची गरज आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी अक्षर पटेलने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. या अष्टपैलू खेळाडूने धावबाद होण्यापूर्वी 31 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले. शिवम दुबेने शेवटच्या षटकांमध्ये 16 चेंडूत 27 धावा जोडल्या.
Innings Break! #TeamIndia post 1⃣7⃣6⃣/7⃣ on the board.
7⃣6⃣ for @imVkohli
4⃣7⃣ for @akshar2026
2⃣7⃣ for @IamShivamDubeOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/c2CcFqY7Pa#T20WorldCup | #SAvIND pic.twitter.com/Xf3aNtgAJO
— BCCI (@BCCI) June 29, 2024
वास्तविक, नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. विराट कोहली आणि रोहित शर्माने पहिल्या षटकात 15 धावा केल्या, मात्र त्यानंतर विकेट्स पडण्याची मालिका सातत्याने सुरू झाली. रोहित शर्माशिवाय ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात उत्कृष्ट भागीदारी झाली.
रोहित शर्मा 9 चेंडूत 5 धावा करून बाद झाला तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत शून्यावरच माघारी परतला. या दोन्ही फलंदाजांना केशव महाराजने बाद केले. सूर्यकुमार यादवही 4 चेंडूत 3 धावा करून कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी भारताची 4.3 षटकात 3 बाद 34 अशी बिकट स्थिती झाली होती मात्र यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. अक्षर पटेल धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, पण विराट कोहलीने एक बाजू रोखून धरली व संघाची धावसंख्या 150 पार नेली. या सामन्यात किंग कोहलीने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2024 च्या टी-20 विश्वचषकातील त्याच्या बॅटमधून आलेले हे पहिले अर्धशतक ठरले.
डावाच्या 19व्या षटकात संघाची धावसंख्या 163 असताना मार्को यानसेनच्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. कोहलीने दुबेसोबत पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. शिवम दुबेच्या रूपाने संघाला सहावा धक्का बसला तो 27 धावा करण्यात यशस्वी ठरला. त्याचवेळी रवींद्र जडेजाच्या रूपाने सातवी विकेट पडली. जडेजा 2 धावावर बाद झाला तर हार्दिक पांड्या पाच धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर केशव महाराज आणि एर्निक नोरखिया यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय मार्को यानसेन आणि कागिसो रबाडा यांना 1-1 असे यश मिळाले.