T20 World Cup 2024 (IND vs SA Final, Score Update) : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषक 2024 चा विजेतेपदाचा सामना खेळला जात आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
अंतिम सामन्यात टाॅस जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. कोरड्या आणि संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये 3 बाद 34 अशी घसरण झाल्यानंतर, भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन करत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारली. याआधी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली नव्हती.
याआधी 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना 173 धावा केल्या होत्या आणि हीच सर्वोच्च धावसंख्या होती, मात्र आता हा विक्रम भारतीय संघानं आपल्या नावावर केला आहे. जर दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या177 धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला तर या विक्रमाची त्यांच्या नावे नोंद होईल.
टी20 विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या
176/7 – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाउन 2024
173/2 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, २०२१
172/4 – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई 2021
161/6 – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, कोलकाता 2016
157/5 – भारत विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग, 2007