T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Match Update) : दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम खेळताना 171 धावा केल्या आहेत. पावसामुळे हा सामना वारंवार थांबवण्यात आला, तरीही कठीण परिस्थितीत टीम इंडिया 170 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली.
एकेकाळी भारताने अवघ्या 40 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या 73 धावांच्या भागीदारीने भारतानं सामन्यात पुनरागमन केले.कर्णधार रोहितने 39 चेंडूत 57 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे, सूर्यकुमारने 36 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विराट कोहलीने षटकार मारून चांगल्या फाॅर्मात येण्याची चिन्हे दाखवली, पण 9 धावांवर रीस टोपलीने त्याला क्लीन बोल्ड केले. आता कुठ भारत संघ संकटातून बाहेर पडू लागला होता तेवढ्यात फॉर्मात असलेला ऋषभ पंतही अवघ्या 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.येथून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून 73 धावा जोडल्या आणि मधल्या षटकांमध्ये जोरदार फलंदाजी केली.दोन्ही फलंदाज 13 चेंडूंच्या अंतराने एकापाठोपाठ बाद झालेे.
15 षटकापर्यंत भारताने 3 गडी गमावून 118 धावा केल्या होत्या, परंतु 16 व्या षटकातच सूर्यकुमार यादव 47 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. पंड्याने 13 चेंडूंच्या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 23 धावा केल्या.त्याने ख्रिस जॉर्डनच्या षटकात दोन दमदार षटकार मारले, पण तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. दुबे हा गोल्डन डकचा बळी ठरला. अक्षर पटेलने सहा चेंडूंत एका षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्या.शेवटच्या 2 षटकांमध्ये रवींद्र जडेजाने 9 चेंडूत नाबाद 17 धावांची छोटी खेळी खेळली आणि भारताची धावसंख्या 171 पर्यंत पोहोचवली.
रोहित शर्माचे सलग दुसरे अर्धशतक…
रोहित शर्माने T20 विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी केली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्याने 57 धावा केल्या. रोहितने आता या विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 7 डावांमध्ये एकूण 248 धावा केल्या आहेत आणि तो या स्पर्धेत भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
जॉर्डनची भेदक गोलंदाजी…
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने एकूण 6 गोलंदाजांचा वापर केला. हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने 3 फलंदाज बाद करणाऱ्या इंग्लिश संघाकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक बळी घेतले. त्यांच्याशिवाय जोफ्रा आर्चर, रीस टोपले, सॅम कुरन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.