T20 World Cup 2024 (IND vs ENG 2nd Semifinal) : भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. आता 27 जून रोजी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. उपांत्य फेरीत जाण्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला आणि आता इंग्लंडचा जुना हिशोब चुकता करण्याची वेळ आहे. तर मग काय आहे तो जुना हिशोब, ते जाणून घेऊया…!
दरम्यान, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून त्या पराभवाचा बदला घेतला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले. आता इंग्लंडचा बदला घेण्याची वेळ आहे.
इंग्लंडकडून घ्यायचा आहे 10 विकेट्सच्या पराभवाचा बदला…
याआधी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाने भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. योगायोगाने या विश्वचषकातही भारताला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. गेल्या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. आता, यावेळी टीम इंडिया याच मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
ॲडलेड ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता 170 धावा करत भारतावर एकतर्फी असा विजय मिळवला होता. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 तर त्याच्यासोबत सलामी देणाऱ्या ॲलेक्स हेल्सने 47 चेंडूंत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 86 धावांची खेळी केली होती.
गयाना येथे रंगणार लढत…
यावेळी 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचा दुसरा सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्यात 27 जून रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल. तर, स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. आता या उपांत्य फेरीत कोण जिंकणार आणि अंतिम फेरीत धडक मारणार? याची सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे.