शिराळा, (प्रतिनिधी) – येथील बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: चिखलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणार्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकाला चिखलमय स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.
शिराळा मुख्य आगार आहे. याच आगारातून तालुक्यातील एस. टी. महामंडळाच्या बसेसचे नियोजन केले जाते. शिराळा बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच बसस्थानकाची दुरवस्था झाल्याचे दिसून येते.
बाहेरुन येणार्या बसगाड्या ज्याठिकाणी उभ्या केल्या जातात. त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये मागील चार दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पाणी साचले आहे.
परिणामी, बसस्थानक परिसर चिखलमय झाला आहे. बसस्थानकात बस गाडीने प्रवेश करताच प्रवाशांना दुरवर जावे लागत आहे. जेणेकरुन चिखल अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर अनेकवेळा प्रवासी पाय घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे बेजार आहेत.
दुसरीकडे ग्रामीण भागातून शहरात येणार्या शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थी बसने शहरात दाखल होतात.
या विद्यार्थ्यांना बसस्थानकावरील साचलेले पाणी व चिखलातून मार्गक्रमण करुन बसस्थानकाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे आगार विभागप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन या बसस्थानक परिसराची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, शालेय विद्यार्थी व नागरिकांमधून होत आहे.