वडगाव मावळ, (वार्ताहर) – दहावी – बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मावळ तालुक्यातील तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळके यांनी ‘सरप्राईज गिफ्ट’ देऊन सुखद धक्का दिला आहे.
तालुक्यातील दहावी बारावीच्या उत्तीर्णांना लोणावळ्याजवळील ‘वेट एन जॉय’ वॉटर पार्क आणि ॲम्युझमेंट पार्कची दोन तिकिटे आमदार सुनिल शेळकेंकडून भेट म्हणून घरपोच पाठवण्यात आली आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये कोणत्याही दिवशी विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर एक पालक वॉटर पार्क व अम्युजमेंट पार्कमध्ये जाऊन आनंद घेऊ शकतात.
यात पार्कमध्ये प्रवेश, पार्क मधील सर्व राईड्स, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे. आमदारांकडून अनपेक्षितपणे करण्यात आलेल्या कौतुकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.