मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत.आज संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत.
पती आणि पत्नी मुख्य सचिव
सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलंय. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
सचिवपदासाठी ‘या’ अधिकाऱ्यांची नावे होती चर्चेत
सेवाज्येष्ठतेनुसार,1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र यामध्ये सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.