मंचर,(प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयात जाऊन एसटी पास, ओळखपत्र पुरवण्याची मोहीम सुरू केली आहे. एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सुरू केली आहे. अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.
शाळा- महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचार्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात 18 जूनपासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवली आहे.
आंबेगाव तालुक्यातील एसटी आगाराच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून, हिरकणी विद्यालय गावडेवाडी, भैरवनाथ विद्यालय अवसरी, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, महात्मा गांधी विद्यालय मंचर,
वाकेश्वर विद्यालय पेठ यासह इतर विद्यालयांना पासचे वाटप करण्यात आले आहे. हे वाटप मंचर आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी, उपयंत्र अभियंता दापोडी येथील अर्चना भदाणे, स्थानक प्रमुख साधना कालेकर इतर पर्यवेक्षक, कर्मचारी, वाहतूक नियंत्रण यांनी केले आहे.
मुलींना मोफत, मलांना 33 टक्के सवलत
शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 33 टक्के सवलत दिली असून केवळ 67 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येणार आहे.
त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जात आहे.