सातारा – सातारा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शनिवारी सकाळी सहा वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीने मिठाई दुकानाला धडक दिली. या अपघातामध्ये दुकानातील कामगार देविदास सोनटक्के (वय ३५, रा. लातूर) गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे एसटी स्थानकात एकच खळबळ उडाली. काळ आला होता. परंतु, वेळ आली नव्हती असा प्रत्यय उपस्थितांना आला.
याबाबतची अधिक माहिती अशी सकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर कोरेगाव एसटी बस सातारा मध्यवर्ती बस स्थानकाच्या 14 क्रमांकाच्या फलाटावर लागत होती. मात्र, त्यावेळी बस चालकाकडून नियंत्रण सुटून बस अनियंत्रित झाली आणि बस समोरच्या मिठाई दुकानाला जोरात धडकली. यामुळे मिठाईच्या दुकानाचे व तेथील साहित्याचे नुकसान झाले.
बसने अचानक दुकानाला धडक दिल्याने स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात देविदास सोनटक्के मांडीला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. सकाळी बस स्थानकामध्ये मोठी वर्दळ होती. अचानक झालेल्या या अपघातामुळे बस स्थानकात बघ्यांची गर्दी जमली. काही प्रवासी मिठाई दुकानालगतच्या फलाटावर असणाऱ्या बेंचवर बसले होते. बस अनियंत्रित झाल्याने त्यांची एकच पळापळ झाली. वाहतूक आगार व्यवस्थापकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.